
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त )चे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर सोमवार २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कुणकेरी प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये घेण्यात आले आहे. या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
याप्रसंगी कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनील परब, माजी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. एल. भारमल, पोलीस पाटील तानाजी सावंत, देवस्थान कमिटी सदस्य सूर्यकांत सावंत, उपसरपंच सुनील परब, पंचायत अधिकारी लीना प्रभू ,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सावंत, ग्रामपंचायत सदस्या माधुरी मेस्री,कुणकेरी शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक विठ्ठल कदम ,तलाठी मारुती सलाम ,माजी सरपंच विश्राम सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष श्री भरत सावंत,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ यु सी पाटील, डॉ. सौ एस जे जाधव, प्रा एम बी बर्गे, प्रा.आर बी. सावंत, प्रा. एम व्ही आठवले, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमअधिकारी डॉ. यू.सी. पाटील यांनी केले.
त्यांनी या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन ,व्यक्तिमत्व विकास ,आरोग्य जनजागृती, ग्रामस्वच्छता ,विज बचत, आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत असे सांगितले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी विद्यार्थ्यांनी खेडेगावात जाऊन श्रमदान करणे व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास करणे हा या श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश आहे असे सांगितले. पंचायत समिती माजी सभापती प्रमोद सावंत यांनी ग्रामीण भागाचा कसा विकास होईल यासाठी विद्यार्थीदशेतच संस्कार घडवणे गरजेचे आहे. या माध्यमातून शहरातील विद्यार्थी खेड्यात येऊन लोकांसाठी काम करतात ही बाबच मुळी अभिमानाची आहे.
सानिया सावंत यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने श्रमसंस्कार शिबिरासाठी आमच्या गावाची निवड केली याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले व सर्व सहकार्य देण्याचे मान्य केले. संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांनी या श्रमसंस्कार शिबिराला शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याने येथील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने स्टेजवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपला व्यक्तिमत्व विकास करावा असेही आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावली गवस हिने केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डाॅ. एस. जे. जाधव यांनी केले.