
चिपळूण : नागपूर येथे झालेल्या कला संमेलन २०२५ या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये चिपळूणच्या नृत्य मल्हार कथ्थक अकादमीने उत्तम यश संपादन केले आहे. या स्पर्धेचे आयोजन नागपूर येथील ए.एन.के.एम. या नृत्य संस्थेने केले होते. देशभरातील विविध राज्यांमधून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
नृत्य मल्हार कथ्थक अकादमीच्या ज्युनियर, सीनियर आणि ओपन अशा तीन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच एकल नृत्य गटात अकादमीच्या चार विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. स्वामिनी सुर्वे हिने ज्युनियर सोलो कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला, आर्या जठार हिने सीनियर सोलोमध्ये द्वितीय क्रमांक, केतकी मराठे हिने सीनियर सोलोमध्ये प्रथम क्रमांक, तर मधुरा जोशी हिने ओपन सोलो कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळविला.
याशिवाय, लहान मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, मोठ्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे ओपन ग्रुप कॅटेगरीत नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या ‘कौशल्यसिंधू’ योजनेअंतर्गत शिकणाऱ्या डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथील प्राध्यापिकांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व यशामागे नृत्य मल्हार कथ्थक अकादमीच्या संस्थापिका व संचालिका नृत्यालंकार गुरु सौ. स्कंधा चितळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्या नेहमीच विद्यार्थिनींना विविध स्तरावर होणाऱ्या स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देत असतात. या घवघवीत यशासाठी गुरु सौ. स्कंधा चितळे, नृत्य मल्हार कथ्थक अकादमी आणि सर्व विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.