न.प.चा एक रूपयाही पचत नाही, कुठूनही बाहेर पडेल : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2024 13:39 PM
views 191  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभारासह शहरातील विविध समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत न.प. कार्यालयात धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामासह सार्वजनिक शौचालय अवस्था, अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.नगरपरिषदेचा एक रूपयाही पचत नाही. तो कुठूनही बाहेर पडेल. त्यामुळे प्रामाणिक काम करा आयुष्य चांगलं होईल अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल. येत्या दहा दिवसांत सर्व विषय मार्गी न लागल्यास पुनश्च धडक देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच मुख्याधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात नव्याने केलेल्या रस्त्यांच्या झालेली दुरावस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. 

सावंतवाडी नगरपालिकेच्या हद्दीतील विविध समस्या तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी माजी साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची वेळ मागितली होती. त्यानुसार नगरपालिकेमध्ये धडक देत मुख्याधिकारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह बांधकाम अधिकारी शिवप्रसाद कुडपकर, पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे, आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर, आणि वन उद्यानचे गजानन परब तसेच अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

 शहरातील नव्याने केलेले रस्ते तीन महिन्यात उखडले गेल्यानं बांधकाम अधिकाऱ्यांवर माजी नगराध्यक्ष साळगावकर प्रचंड संतापले. झालेलं काम योग्य असल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी दिलाच कसा ? बील अदा कसं केलंत ? काम योग्य झालं तर रस्ता उखडला कसा ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली. झालेल्या निकृष्ट कामाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले. यावेळी न.प.मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून अधिकारी वर्ग याला बळी पडत आहेत‌. यावर कुणाचाच लक्ष नसून मुख्याधिकारी म्हणून आपण कमी पडलात असे खडे बोल श्री. साळगावकर यांनी सुनावले. माझी नगरपालिका बदनाम होऊ नये म्हणून आपण इतके दिवस गप्प होतो. मात्र, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून आपल्याला या ठिकाणी येण्यास आपण भाग पाडले असेही ते म्हणाले. सावंतवाडी नगरपरिषदेचा एक रूपयाही पचत नाही. तो कुठूनही बाहेर पडेल. त्यामुळे प्रामाणिक काम करा आयुष्य चांगलं होईल अशा शब्दांत श्री. साळगावकर यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना फैलावर घेतल. आरोग्य व बांधकाम विभागाच्या कारभाराचा त्यांनी पंचनामा केला.  नगरपरिषद हे भ्रष्टाचाराच कुरण झाल्याच्या आविर्भावात काही कर्मचारी वावरत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. संबंधित दोषींवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर सुधीर पराडकर, अभय पंडित, अगस्तीन फर्नांडिस, प्रा. घारपुरे, रवी जाधव, सिताराम गावडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...तर ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

न.प.च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड संबंधित ठेकेदाराकडून अद्यापही देण्यात आलेला नाही. असे असताना संबंधित ठेकेदारांचे बिल कसे अदा करण्यात आले ? असा प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे संबंधित ठेकेदारान एका महिन्याच्या आत कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करा व कामगारांचे पैसे गणपतीपूर्वी वाटप करा अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली.

न. प ला भिक नाही लागली  !* नवीकोरी अॅम्बुलन्स दोन वर्ष सुरू नसल्यान मुख्याधिकारी यांना श्री. साळगावकर यांनी जाब विचारला. ही अॅम्बुलन्स महिन्याभरात चालू करा, दोन ड्रायव्हर नेमा. ती चालवायला संस्थेची गरज नाही. त्याची वाट बघत बसू नका. नगरपरिषदेला भिक लागलेली नाही. आम्ही न.प. कर्जमुक्त केली आहे‌ अस मत त्यांनी व्यक्त केले. 

प्रशासनाला रस्त्यावर उतरवलं

दरम्यान, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह बांधकामच्या अधिकाऱ्यांना घेत बबन साळगावकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला बाजारपेठेतील रस्त्यांची झालेली दुरावस्था निदर्शनास आणून दिली. नव्यान केलेल्या या रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेवरून जाब विचारला. ठेकेदाराच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दहा दिवसांत रस्ते पुर्ववत करण्याचा इशाराही दिला.