
सावंतवाडी : नाणोस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्राजक्ता शेटये यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या अविश्वास ठरावावर आज झालेल्या मतदान प्रक्रियेत सरपंच शेटये यांच्या विरोधात १९२ तर बाजूने २२ इतके मतदान झाले. त्यामुळे हा ठराव सदस्यांच्या बाजूने पारित करण्यात आला. त्यामुळे नाणोस ग्रामपंचायतचा सरपंच पदाचा चार्ज आता उपसरपंच यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबतची माहीती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली.
नाणोस संरपच असलेल्या शेटये यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सातपैकी सहा सदस्यांनी त्याच्या विरोधात अविश्वास ठराव घेतला होता. या ठरावानुसार आज ग्रामंचायत नाणोस येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठरवायच्या अनुषंगाने झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सुरुवातीला सदस्यांचे मतदान घेण्यात आले. यावेळी विरोधात असलेल्या सहापैकी सहा सदस्यानी सरपंचाच्या विरोधातच मतदान केले. त्यानंतर ग्रामस्थांचे मतदान झाले. यामध्ये एकूण 220 मतदानापैकी 192 इतके मतदान सरपंच यांच्या विरोधात तर फक्त 22 एवढे मतदान सरपंचांच्या बाजूने झाले. संपूर्ण प्रक्रिया मत पत्रिकेद्वारे घेण्यात आली. त्यामुळे सरपंचाच्या विरोधात घेण्यात आलेल्या ठराव या ग्रामसभेत पारित करत सरपंच पदाचा चार्ज उपसरपंच यांच्याकडे देण्यात आला. त्यामुळे आता ग्रामपंचायत सरपंच पदाची फेर निवडणूक होणार आहे.