
कणकवली : आज सकाळी ओम गणेश बंगल्यावर आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भिरवंडे - गांधीनगर येथील सरपंच मंगेश बोभाटे यांच्यासह ग्रा. पं. सदस्या सुनीता अनाजी सावंत, प्रसन्ना प्रशांत सावंत, मंजुषा महादेव बोभाटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. मात्र आजच सायंकाळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निवासस्थानी मीडियाशी बोलताना ग्रा. पं. सदस्या सुनीता अनाजी सावंत आणि प्रसन्ना प्रशांत सावंत यांनी भाजपा पक्षप्रवेश केला नसून आम्हाला विकासकामांबाबत आमदारांशी बोलायचे असल्याचे सांगून फसवून राणेंच्या बंगल्यावर नेण्यात आल्याचे सांगितले. आमची भाजपा पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केली असून आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, भाजपात गेलेलो नाही असेही सांगितले. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक असलेल्या सरपंचांसह ग्रा. पं. सदस्यही भाजपात गेल्याने हा सतीश सावंत यांना राजकीय धक्का मानला जात होता. मात्र संध्याकाळी या पक्षप्रवेशाला मिळालेल्या कलाटणीमुळे भाजपा पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत.