
दोडामार्ग : घोटगे येथे केळी नुकसानीला सहा महिने होवून गेले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे याविरोधात तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचे निवेदन तहसीलदार यांना विनय भगवान दळवी, सतीश यशवंत परब यांनी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, फेब्रुवारी २०२५ रोजी अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने घोटगे येथील ३५ हजार केळी भुईसपाट झाल्या होत्या. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घोटगेतील युवक नोकरीच्या मागे न लागता शेती हाच केंद्रबिंदू मानून आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करीत आहेत. परंतु सहा महिन्यापूर्वी झालेल्या चक्रीवादळात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील युवक मेटाकुटीस आला आहे.
सलग चार वर्षात तीन चक्रीवादळ व एक वेळा पूरहानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वारंवार हीच परिस्थिती उद्भवत असल्यामुळे गावातील तरूण युवकांवर शेती सोडण्याची पाळी आली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी शासनाकडून एका केळीला १० रु. ८० पैसे नुकसान भरपाई दिली जाते. मात्र प्रत्यक्षात एका केळीला खर्च २५० रु. येतो. चक्रीवादळ होवून शेतकऱ्यांची केळी बागायती नष्ट झाल्याच्या घटनेला सहा महिने उलटून गेले. त्यावेळी ताबडतोब पंचनामे झाले. परंतु अजूनपर्यंत नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नाही. वन्य प्राण्यांपासून केळीचे नुकसान झाल्यास वनविभाग एक केळीला २५० रु. नुकसान भरपाई देतो. याच धर्तीवर नुकसान भरपाई मिळावी व ताबडतोब यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी करत १५ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयासमोर घोटगे शेतकरी व ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.