
सावंतवाडी : सावंतवाडीतील वेंगुर्ला आगारातून सुटणाऱ्या वेंगुर्ला-सातार्डा बस फेरी अनागोंदी नियोजनामुळे फटका बसला. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना फटका बसला असल्याने पुन्हा एकदा वेंगुर्ला आगारातील कारभार हा चव्हाट्यावर आलाय. वेंगुर्ला आगारातील बस फेऱ्यांचे नियोजन वादाचा विषय ठरला आहे. ही बस बरी तात्काळ पूर्ववत करा. अन्यथा, वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.
वेंगुर्ला आगार नेहमीच चर्चेत असतं. मग, ते बस फेऱ्यांमुळे असो किंवा तेथील कर्मचाऱ्यांमधील वादावादी असो, नियमित वेंगुर्ला आगार हा चर्चेचा विषय असतो. वेंगुर्ला आगारातून वेंगुर्ला शिरोडा मार्गे सातार्डा जाणारी बस ही वस्तीची बस असून ही बस शालेय मुले, नोकरदार, व्यावसायिक व कॉलेज विद्यार्थ्यांकरिता सकाळी सातार्डा येथून वेंगुर्लेकडे जात असताना सातार्डा साटेली कोंडुरे मळेवाड आजगव या ठिकाणच्या प्रवाशांसाठी सोयीची ठरते. मात्र वेंगुर्ला आगारातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व ढिसाळ नियोजनामुळे ही बस फेरी गेले दोन दिवस बंद आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी नोकरदार व्यावसायिक शालेय मुले यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे असे मतही श्री. मराठे यांनी व्यक्त केले आहे.










