
वेंगुर्ले : आडेली पंचायत समिती मतदारसंघातून सर्वसाधारण जागेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नितीन मांजरेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे.
आडेली मतदारसंघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात पंचायत समिती साठी महायुतीकडून शिंदे शिवसेनेतर्फे उमेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज मंगळवार २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेश नाईक यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नितीन मांजरेकर यांना महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, आडेली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती भक्कम राहण्यासाठी व वरीष्ठ नेत्यांचा शब्द मानून आपण उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्रतिक्रिया उमेश नाईक यांनी दिली आहे.










