
सिंधुदुर्गनगरी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस येथील भवानी मंदिर परिसर पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. सोमवारी (दि. २६ जानेवारी २०२६) दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडरवर चढून पलटी होत थेट विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून महावितरणच्या विद्युत खांबालाही फटका बसला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानस विजय पांडे (वय २१, रा. ठाणे पश्चिम) हा आपल्या ताब्यातील शेवरलेट क्रूझ एलटीझेड (MH 05 AX 5665) ही कार गोवा–मुंबई लेनवरून अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार डिव्हायडरवर चढून पलटी झाली आणि भवानी मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवरील एसबीआय व युनियन बँक एटीएमसमोर असलेल्या महावितरणच्या सिमेंट काँक्रीट विद्युत खांबावर जोरदार धडकली.
या अपघातात कारमधील सविता पांडे (५०), मंगलम पांडे (२३) आणि मनीष गुप्ता (२१) हे तिघे प्रवासी जखमी झाले असून त्यांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमी ठाणे पश्चिम येथील रहिवासी आहेत.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, ओरोस येथील भवानी मंदिर परिसरात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असून हा भाग अपघातप्रवण ठरत असल्याने येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे










