
सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची समिती गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून, जिल्ह्यात प्रशासनात राबविण्यात येत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या समितीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, तसेच संदीप साटम आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे म्हणाले, “पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी येतो, तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असून, आपल्या कार्यपद्धतीकडे देशाचे लक्ष लागले आहे
ते पुढे म्हणाले, “देशभरातील जिल्ह्यांमध्ये केवळ सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात AI प्रणालीचा वापर करतो. या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाची टीम येथे आली आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या विभागात AI मॉडेल कसे वापरले आहे, हे टीमकडून पाहिले जाणार आहे.”
पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा जिल्हे AI मॉडेलवर विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे नीती आयोगाने जिल्ह्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
राणे म्हणाले, “माझे वडील नारायण राणे यांनी पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला साक्षर जिल्हा बनवले. आज मी त्या जिल्ह्याला AI च्या माध्यमातून प्रगत बनवण्याचे काम करीत आहे. हा आपल्या जिल्ह्याच्या विकास प्रवासातील नवा टप्पा आहे.”
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि साक्षरतेसाठी ओळखला जाणारा जिल्हा असून, आता तो AI प्रणालीचा मार्गदर्शक जिल्हा म्हणून देशात ओळख निर्माण करीत आहे. नीती आयोगाच्या या भेटीमुळे जिल्ह्याच्या विकास आणि प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.










