
सिंधुदुर्ग : माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवून दिले आहे.आणि मुळात रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवण्यासाठीच नितेश राणेंनी जनता दरबार आयोजित केला होता का? असा प्रश्न माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी हजारो तक्रारी प्रश्न आल्याचे आणि ते प्रश्न मार्गी लावल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ते प्रश्न अद्यापही न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला गर्दी झाली होती. तीन वर्षे भाजप पक्षाची सत्ता असूनही जनतेचे प्रश्न सुटत नाहीत,लोकांना जनता दरबारात गर्दी करावी लागते हे दुर्दैव आहे. नितेश राणेंनी जनता दरबार घेऊन रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली आहेच त्याचबरोबर सत्ताधारी भाजपच्या काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे हे देखील उघड झाले आहे.अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.