
सावंतवाडी : जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते जास्त आहेत. खासदार भाजपचे असून पालकमंत्री मी आहे. जिल्ह्यातून नारायण राणेंना लोकसभेत ९५ टक्के मतदान होत. या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवण्याचा, आत्मपरीक्षणाचा अधिकार असल्याचे मत राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते, रेल्वे टर्मिनसह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. 'एआय' माध्यमातून जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांती घडविण्याचा माझा मानस आहे असंही श्री. राणेंनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठका होत असून सावंतवाडी मतदारसंघाची बैठक आज पार पडली. यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांतील परिस्थितीचा जिल्हा परिषद निहाय अभ्यास आम्ही केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच उद्दीष्ट आमचं होत.प्रदेशसह वरिष्ठांना जिल्ह्यातील परिस्थिती कळवू, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार निवडणूक लढवू अशी माहिती त्यांनी दिली.
मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू !
दरम्यान, पाऊस अधिक प्रमाणात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यात मार्ग काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व आम्ही करत आहोत. पावसानं थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल. खड्डे भरले जात नाही अशी स्थिती नाही. मात्र, पावसामुळे ते पुन्हा पडत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ही परिस्थिती लवकरच बदलेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते अधिक चांगले असणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणक्षेत्रात 'AI' क्रांती !
तसेच शिक्षण क्षेत्रात विविध पद्धतीचे प्रयोग 'एआय'च्या माध्यमातून होत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अमेरिकेतील शिक्षक जिल्ह्यातील मुलांना शिक्षण देऊ शकतो अशी यंत्रणा उपलब्ध आहे. विद्यार्थांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे विविध मार्ग एआयच्या माध्यमातून उपलब्ध असून जिल्हा, राज्य पातळीवर आम्ही याचा अभ्यास करत आहोत. शिक्षण क्षेत्रात विक्रांत सावंत यांसारखे सहकारी मोठ्या पदावर येत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात सिंधुदुर्गच्या भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात एआयचा वापर होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
रेल्वे टर्मिनसचाही विषय घेतला !
दरम्यान, प्रवासी संघटनेकडून दिलेल्या निवेदनानुसार मी रेल्वे मंत्री यांना भेटलो. माझ्या हातात तेच निवेदन होत. सावंतवाडी टर्मिनसचाही विषय यात होता. रेल्वेमंत्री अनुभवी असून मार्ग काढणारे आहेत. खासदार म्हणून नारायण राणे तिथे आहेत. पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा करत आहे. राज्यात महायुतीच सरकार आहे त्यामुळे निश्चितच हे प्रश्न सुटतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.










