नितेश राणेंनी राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा गावच्या आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात : सुशांत नाईक

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 21, 2023 13:00 PM
views 169  views

कणकवली : राज्य व देशाच्या प्रश्नावर बोलणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या कणकवली तालुक्यातील वरवडे गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये समस्यांची वाणवा असून, आमदार नितेश राणे यांनी देश पातळीवर बोलण्यापेक्षा अगोदर गावातील आरोग्य केंद्राच्या समस्या सोडवाव्यात. गेली 30 वर्ष सातत्याने सत्तेत असणाऱ्या राणेंनी इतर प्रश्नांवर लक्ष देण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या गावात असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असा टोला युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला. 

वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा सेनेच्या शिष्टमंडळाने भेट देत तेथील समस्यांची माहिती घेत येथे असलेल्या समस्यांचा सर्वांसमक्ष पंचनामा केला. यावेळी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहात पाणी नाही, आरोग्य केंद्रात ओपीडी साठी येणाऱ्या रुग्णांना गळक्या इमारतीत बसावे लागत असून, फार्मासिस्ट सह अन्य रिक्त पदे व नियमित डॉक्टर नसल्याने रुग्णांची हाल होत आहेत. अशा स्थितीत आमदार राणे गेल्या वर्षभरात या समस्या असून देखील गावातल्या आरोग्य केंद्राकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे इतर विषयावर बोलणाऱ्या राणे यांनी आपल्या गावातील प्रश्नावर अगोदर बोलावे असा टोला देखील श्री. नाईक यांनी लगावला. 

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या समस्या जाणून घेत असताना काही दिवसांपूर्वी श्री. नाईक यांनी कणकवली मतदार संघातील वैभववाडी ग्रामीण रुग्णालय व उंबर्डे आरोग्य केंद्रातील समस्या जाणून घेतल्या. तेथील अनेक समस्या समोर आल्यानंतर आज युवा सेनेच्या शिष्टमंडळाने सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे भेट देत पाहणी केली. यादरम्यान जीर्ण व धोकादायक असलेल्या इमारतीमध्ये डॉक्टर व कर्मचारी वर्ग कार्यरत असून नवीन इमारतीमध्ये अद्याप आरोग्य विभाग शिफ्ट झाला नसल्याची बाब निदर्शनास आली. तसेच आरोग्य केंद्राच्या पाहणी दरम्यान आरोग्य केंद्रामधील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याचे फलक दरवाजावर लावण्यात आले असल्याने ही बाब गंभीर असून मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या राणे यांच्याच गावात हा दिव्याखाली अंधार असेल तर जनतेने न्याय कुणाकडे मागावा असा देखील सवाल यावेळी नाईक यांनी उपस्थित केला. 

सुशांत नाईक यांनी या पाहणी दरम्यान तेथील उपस्थित अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितली जात असून औषधांचा साठा किती आहे? असा सवाल उपस्थित केला . त्यावर तेथील आरोग्य सहाय्यक यांनी औषधांचा साठा आहे. मात्र जर कमी पडला तर रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून तो खरेदी केला जातो असे सांगितले. मग रुग्ण कल्याण समितीकडून खरेदी होत असेल तर काही रुग्णांना बाहेरून औषधे का आणावी लागली? असा सवाल धनंजय सावंत यांनी केला. आरोग्य केंद्राच्या इमारतीची ड्रेनेज लाईन योग्य प्रकारे खाली गेली पाहिजे ती गेलेली नसल्याची बाब या चर्चेदरम्यान समोर आली. मात्र हे काम का झाले नाही याचे उत्तर याप्रसंगी कर्मचारी किंवा अधिकारी देऊ शकले नाहीत. गळकी इमारत तसेच आरोग्य केंद्रासाठी पाण्याची व्यवस्था नसणे अनेक समस्यांबाबत शासन स्तरावर प्रस्ताव देऊनही ते अद्याप मंजूर झाले नसल्याने ही कामे रखडल्याचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र यावर अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. त्यावेळी श्री नाईक यांनी जर आमदारांच्या गावामध्ये ही स्थिती असेल तर मतदार संघात काय असेल? असा सवाल केला. 

आरोग्य सहाय्यक श्री. आचरेकर यांनी कर्मचारी वसाहतीमध्ये डॉक्टर राहत असून 11 महिन्याच्या बॉण्डवर डॉक्टर असल्याचे सांगितले. मात्र इतर ठिकाणी स्वखर्चाने कर्मचारी दिल्याचा स्टंट करणारे आमदार नितेश राणे स्वतःच्या गावात कायमस्वरूपी डॉक्टर शासनाकडून का आणू शकत नाहीत? की फक्त दिखाऊपणापुरते हे काम केले जाते. स्वतःच्या गावातील आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग अपूर्ण असताना याची भरती का झाली नाही? असा सवाल देखील श्री नाईक यांनी केला. आमदार आपल्या गावातील या आरोग्य केंद्रात केव्हा आले? असा सवाल सुशांत नाईक यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी येऊन गेले असे उत्तर देताच युवासेना पदाधिकाऱ्यांनी केव्हा आले? असा प्रतिसावाल केला. मात्र जर आमदार येऊन गेले तर या समस्या का सुटल्या नाहीत? असा प्रश्न करत तुम्ही घाबरून उत्तरे द्यायला टाळू नका असे राजू राठोड यांनी सांगितले. तुमचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत त्यामुळे असलेली खरी माहिती द्या अशी मागणी सुशांत नाईक व युवा सेना जिल्हा समन्वयक राजू राठोड यांनी केली.  

आमदार नितेश राणे केंद्र व राज्यस्तरावर आपण प्रश्न मांडत असल्याचे भासवतात. पण त्यांच्या गावातील वस्तुस्थिती समोर आल्याने अगोदर राणेंनी आपला गावातील समस्या सोडवाव्यात येथील जनतेला चांगली दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी व नंतरच राज्य आणि केंद्राच्या गोष्टी कराव्यात असा टोला देखील यावेळी श्री नाईक यांनी लगावला. शिवसेनेचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत होते त्यावेळी  या आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र जर येथील कर्मचारी व डॉक्टरांना चांगली रुग्णसेवा देण्याकरता आवश्यक सुविधांचीच वाणवा असेल तर येथील रुग्णांना रुग्णसेवा चांगली कशी मिळणार? असा सवाल देखील नाईक यांनी केला  या आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ कृष्णा व्हरे यांच्याशी देखील चर्चा करून त्यांना येथे भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. 

यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत युवासेना जिल्हा समन्व्यक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, विभाग प्रमुख अनुप वारंग, कलमठ युवासेना  शहरप्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना विभागप्रमुख - रोहित राणे, धनंजय सावंत,कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन कोचरे आधी उपस्थित होते.