वाळूचोरांची यापुढे गय नाही : पालकमंत्री नितेश राणे

शंभर वेळा विचार करतील अशी कडक कारवाई होणार / वाळूचोरी मागे अमली पदार्थांचा व्यवसाय?
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 15, 2025 19:47 PM
views 227  views

सिंधुदुर्गनगरी :  वाळू चोरी करताना वाळू माफीयांचे हात कापले पाहिजेत. वाळू चोरी करताना ते शंभर वेळा विचार करतील अशी कडक कारवाई यापुढे केली जाईल. कोणी कितीही मोठा पाठिंबा असला तरी या वाळू माफियांना सोडले जाणार नाही. वाळूच्या चोरी पाठीमागून अमली पदार्थांचा व्यवसाय करून येथील पिढी बरबाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा कदापी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिला.

      स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. वाळू चोरी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार राणे म्हणाले की, वाळू चोरी संदर्भात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे, की आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफिया किंवा वाळू चोरी असो अनधिकृत वाळू उत्खनन असो यांची कुठेही आम्ही गय करणार नाही.भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचा कृतीतून  काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. कडक सेक्शन लावून वाळू चोरी करणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल. अशी कारवाई केली जाईल की वाळू माफी यांचे हात कापले पाहिजे.  तशा प्रकारची कारवाई पुढे दिसेल. परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल जेणेकरून सिंधुदुर्गच्या भविष्याबरोबर कोणी खेळता कामा नये. ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी त्यांच्या कारकीर्दीत व्हायला दिले नाही ते मी माझ्या कारकिर्दीत कदापी व्हायला देणार नाही.असे स्पष्ट केले.