सिंधुदुर्गनगरी : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहत आहोत. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (safety norms) प्राधान्य देत दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरूस्तीचे उर्वरित काम युद्ध पातळीवर पूर्ण करा. प्रवासी सुरक्षितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. १५ जानेवारी पर्यंत घाट मार्ग चालू होणार असे संबंधित विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र १० जानेवारीला पुन्हा घाट मार्गाची पाहणी करण्यात येईल. काम समाधानकारक झाल्यानंतरच १५ जानेवारीपासून एकेरी मार्ग (वैभववाडी ते कोल्हापूर) चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यंत्रणांनी त्या अनुषंगाने वेगाने काम करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.
करूळ घाट मार्गाची श्री राणे यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री घाटगे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, उपकार्यकारी अभियंता शिवनीवर आदी उपस्थित होते.
श्री राणे यांनी यावेळी संबंधित विभागाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. दरडी कोसळणाऱ्या भागाच्या बाजूने बेस्टवॉल, रस्त्याच्या खालच्या बाजूने रिटेनिंग वॉलचे काम पूर्ण करावे, धोकादायक वळणांची कटिंग करावी, दरीकडील संरक्षक कठड्यांची उंची वाढवून ती अधिक मजबूत करण्याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. घाट रस्त्याच्या कामाबाबत जनतेला समाधान वाटलं पाहिजे. घाटमार्ग जनतेला व प्रवाशांसाठी सुरक्षित वाटला पाहिजे. कामाची गती वाढवावी. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच घाटमार्ग सुरू केला जाईल. संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी कामात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही श्री राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना सुचना दिल्या. घाटातील रस्त्याच्या काही भागाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते निकषानुसार करावे तसेच कांक्रीटीकरणाचे काम गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देशही श्री पाटील यांनी दिले.