LIVE UPDATES

नागरिकांनी धोकादायक साकवांचा वापर करु नये : पालकमंत्री नितेश राणे

जनजागृतीसाठी फलक लावावेत
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 16, 2025 20:13 PM
views 157  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात साकव बांधण्यात आलेले आहेत. काही साकव बांधुन बरीच वर्षे झालेली आहेत तर काही साकव नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सध्या पावसाचे दिवस पाहता नागरिकांनी धोकादायक साकवांचा वापर न करण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री शेलार, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, श्रीमती पवार , श्री सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील धोकादायक साकव नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करावेत. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा जेणेकरुन दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे अशा ठिकाणचे साकव वापरासाठी पुर्णपणे बंद करा. गांवकऱ्यांनी देखील जागरुक राहून धोकादायक साकवांचा वापर टाळावा असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे  यांनी यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची तात्काळ दुरूस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजे जेणेकरुन वारंवार ही समस्या निर्माण होणार नाही. आगामी काळात सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रवासामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.