पत्रकारांना अरेरावी भोवणार

पालकमंत्र्यांच्या कठोर कारवाईच्या सूचना
Edited by:
Published on: March 08, 2025 18:32 PM
views 843  views


दोडामार्ग : माटणे येथे पत्रकारांना अरेरावी करण्याची घटना अतिशय निंदनीय आहे. संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना आपण केल्या आहेत. या आरोपींची अजिबात गय केली जाणार नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. प्रशासन जर कारवाई करण्यात कुचराई करत असेल असे आपणास जाणवल्यास आपण थेट माझ्याशी संपर्क साधा असे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

माटणे येथे तालुक्यातील तीन पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५:३० वा‌.च्या सुमारास गेले होते. येथील पूर्वाचार देवस्थान जवळील काट्याजवळ रस्त्यालगतच पत्रकारांना मोठ्या प्रमाणात माती साठा करून ठेवल्याचे  दिसले. त्यामुळे पत्रकारांनी तेथे जात फोटो काढण्याचा प्रयत्न केला. खासगी जमिनीत हा मातीसाठी असल्याने पत्रकारांनी जमिनीच्या गेटबाहेर उभे राहून मातीचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संशयित नवनाथ नाईक हा त्याच्या कारने तेथे आला व एका पत्रकाराला फोटो टिपण्यास मज्जाव केला. तसेच पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. गेट बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करत गेटच्या आत नेले. त्यानंतर विठ्ठल नाईक हा लाकडी दांडा हातात घेऊन पत्रकारांच्या अंगावर धावून येऊ लागला. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करू लागला. 

या घटनेविरुद्ध तालुका पत्रकार समिती आक्रमक झाली व येथील पोलीस ठाण्यात संशयित बाप-लेकाविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला. पालकमंत्री नितेश राणे यांचा शनिवारी जिल्हा दौरा होता. यावेळी तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली व निवेदन देत पत्रकारांवर अरेरावी करणाऱ्या बाप-लेकावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, खजिनदार रत्नदीप गवस, जिल्हा कार्यकारिणी लवू म्हाडेश्वर,सदस्य सुहास देसाई,  संदेश देसाई, ओम देसाई, समीर ठाकूर, लवू परब उपस्थित होते.