पाणी प्रश्न सोडविण्याच्या नितेश राणेंच्या सूचना

जलजीवन, जिल्हा नियोजनच्या विविध कामांचा घेतला आढावा
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 22, 2024 14:53 PM
views 97  views

कणकवली : जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामाला चालला देण्यासाठी व विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या नादुरुस्तीमुळे त्या भागातील निर्माण झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या समवेत एक बैठक घेत विविध प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या.

निवडणुक आचारसंहितेमुळे गावा गावातील अनेक विकास कामे थांबली होती. यामध्ये रस्ते गटारे वर्ग खोल्या शाळा दुरुस्तीची कामे अशा कामांना गती देण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली विविध कामे तातडीने सुरु करावीत याकडे आमदार नितेश राणे यांनी लक्ष वेधले. 

विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या तांत्रिक बिघाडामुळे  या योजनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील काही गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. जीवन प्राधिकरण विभागाने या योजनेवरील तांत्रिक कामे पूर्ण करून तातडीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशा सूचनाही आमदार नितेश राणे यांनी केल्या.

जलजीवन योजनेमधून  गावागावातील अनेक कामे मंजूर आहेत. पावसाळा तोंडावर असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी या विभागाने  त्याचा पाठपुरावा करावा  व रिकामे मार्गी लावावी अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या.

या बैठकीला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील जलजीवन योजनेचे प्रमुख  उदयकुमार महाजनी  आधी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.