
म्हापण : पाट हायस्कूल तिठ्ठ्यावर जीर्णावस्थेत असलेल्या एसटी बस निवारा शेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून येथे नव्याने सुसज्ज निवारा शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
म्हापण–कोचरा मार्गावरील पाट हायस्कूल तिठ्ठा हा परिसरातील महत्त्वाचा बसथांबा असून, अनेक वर्षांपूर्वी येथे प्रवाशांच्या सोयीसाठी निवारा शेड उभारण्यात आली होती. मात्र काही दिवसापूर्वी या शेडचे पत्रे उखडून गेल्याने संपूर्ण शेड जीर्ण बनली होती. आता पाऊस सुरु झाल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ, पप्रवाशांची अडचण होतं होती. शेड असूनही त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याने प्रवासी वर्गात नाराजीचे वातावरण होते.
या समस्येची माहिती ग्रामपंचायतीने आमदार निलेश राणे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्यामार्फत नव्या बस निवारा शेडच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार मजबूत, सुरक्षित आणि आकर्षक अशी नवीन निवारा शेड अल्पावधीत उभारण्यात आली.
नवीन शेडमुळे पाट हायस्कूलमध्ये येणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, परिसरातील ग्रामस्थ तसेच दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळू लागले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही शेड उभारल्याने नागरिकांनी समाधान करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.










