
कुडाळ : "माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात मच्छीमार बांधवांना आणि व्यावसायिकांना ३५२ नोटिसा आल्या होत्या. सातत्याने खोटं बोलण्याचा पुरस्कार जर कोणाला द्यायचा असेल, तर तो वैभव नाईकांना द्यावा," अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. या नोटिसांचे पुरावे हवे असल्यास त्यांनी मला फोन करावा किंवा मी ते कुरिअर करायलाही तयार असल्याचे आव्हान राणे यांनी दिले आहे.
नोटिसांचा पाढा आणि पुराव्यांचे आव्हान
निलेश राणे यांनी सांगितले की, "२८ जुलै २०१७ रोजी ९२ नोटिसा आल्या, १९ जानेवारी २०१८ ला ७३ नोटिसा आल्या, २० फेब्रुवारी २०१८ ला १८७ नोटिसा आल्या. तसेच २०२३ मध्येही काही नोटिसा आल्या होत्या. या सर्व नोटिसा मी सोशल मीडियावर जाहीर करणार आहे." या नोटिसा मालवणमध्येच का आल्या, असा सवाल करत त्यांनी वैभव नाईक यांच्या अभ्यासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"या नोटिसा कोणा सरकारी अधिकार्याने स्वेच्छेने काढलेल्या नाहीत, तर मालवणमधीलच एका व्यक्तीच्या तक्रारीमुळे या नोटिसा निघाल्या आहेत. देवगड आणि वेंगुर्ल्यातही अशाच तक्रारींमुळे कारवाई होत आहे. साधी अक्कल नसल्यामुळे माजी आमदार चुकीची विधाने करत आहेत. त्यांना ना कायद्याचे ज्ञान आहे, ना त्यांनी कधी वाचन केले आहे," अशी खोचक टीका राणे यांनी केली.
मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
मच्छीमार बांधवांच्या प्रश्नावर बोलताना निलेश राणे म्हणाले, "मच्छीमार बांधवांना मी एकटा सोडणार नाही. त्यांच्यासाठी कोर्टात जावे लागले तरी मी सर्वात पुढे असेन. मागील १० वर्षांत नाईकांनी मच्छीमारांचे प्रश्न सभागृहात कधी मांडले हे दाखवून द्यावे. आता मच्छीमार अडचणीत आहेत हे पाहून ते केवळ कॅमेऱ्यासमोर येऊन बोगसपणा करत आहेत."
कायमस्वरूपी तोडगा काढणार
ज्या समस्या मागील १० वर्षांत सुटल्या नाहीत, त्यावर आपण आणि पालकमंत्री मिळून कायमस्वरूपी मार्ग काढणार असल्याचे आश्वासन राणे यांनी दिले. "मंत्रालयात ज्यांचे साधे वजन नव्हते, ज्यांना ओळख करून देण्यासाठी सुप्रिया सुळे यांची मदत घ्यावी लागली, त्यांच्याकडून मच्छीमारांना काय अपेक्षा असणार?" असा टोलाही त्यांनी लगावला.










