कुडाळातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा

निलेश राणेंनी वेधलं कुडाळ पोलीस निरीक्षकांचं लक्ष
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 12, 2024 12:00 PM
views 605  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री ४० तर दिवसा आवाजाची मर्यादा ५० डेसिबल इतकी असावी. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री ४५ तर दिवसा ५५ डेसिबलपर्यंत असावी. वाणिज्य क्षेत्रात हीच मर्यादा रात्री ५५ तर दिवसा ६५ डेसिबलपर्यंत आहे आणि औ‌द्योगिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री ७० तर दिवसा ७५ डेसिबल इतकी आहे. असे असले तरी धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी लावलेले भोंगे प्रत्यक्षात लावलेल्या ठिकाणी ही आवाजाची मर्यादा पाळत नाहीत.

भोंगे लावल्याने कायद्याचे उल्लंघन होत नाही. मात्र त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेऊन आणि वरील आवाजाच्या मर्यादित ते लावणे बंधनकारक आहे, मात्र अजान देतांना त्याचे पालन होत नाही. तरी अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण यासंदर्भात कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यावर धडक कारवाई करावी, असे आ. निलेश राणे यांनी निवेदनात म्हटले आहे.