चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 29, 2023 16:02 PM
views 625  views

मालवण : चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झाली आहे अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे आता चिपीवरून रात्रीची विमानसेवा सुरु होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याने चिपी विमानतळाच्या अडचणी देखील दूर होऊन सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा अशीच मागणी आता जिल्हा वासियांकडून होऊ लागली आहे. 


चिपी विमानतळ सुरू झाल्यापासून अनेक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावं लागलं आहे. अनेकवेळा विमानसेवा रद्द झाली आहे. शिवाय अनेक तांत्रिक अडचणीचा देखीला फटका विमानसेवेला बसला. विमानसेवा रद्द देखील झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच रात्र झाल्याने मुंबईला जाणारे विमान रद्द करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यामुळे विमानसेवा सुधारणार केव्हा असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला होता. 


नौसेना दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणला येत आहेत. त्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विमानतळ, हलिपॊडला जोडणारे सर्व रस्ते तुळतुळीत करण्यात आले आहेत. देशातील अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी मंडळी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे चिपी विमानतळावर सर्व सुविधा असणे गरजेचे होते. त्याचाच भाग म्हणून नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित होणे आवश्यक होते. यासह इतर तांत्रिक अडचणी देखील आहेत त्या सुद्धा या निमित्ताने मार्गी लागण्याची शक्यता आहे.