
कणकवली : कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ, छात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाच्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. या स्पर्धेसाठी तयार केलेले मैदान पाहून या मित्रमंडळाचा अभिमान वाटतो. खरोखरच आगामी काळात क्रिकेटचे चांगले खेळाडू घडवण्यासाठी चांगल्या मैदानाची आवश्यकता आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कणकवलीत भव्यदिव्य असे मैदान होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.
कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी, छात्रोकुलोत्पन्न मराठा समाज आयोजित गावडेवाडी प्रिमिअर लीग 2025 डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री, सुनील नाडकर्णी, मिठबांव सरपंच भाई नरे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवली पत्रकार संघ अध्यक्ष भगवान लोके, बेळणे सरपंच अविनाश गिरकर, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, बाबू घाडी, अशोक लोके, मंगेश गावकर, अण्णा कोदे, सर्वेश दळवी , माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
मनोज रावराणे म्हणाले , गावडेवाडी मित्रमंडळाच्यावतीने भव्यदिव्य ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . त्यामागे कार्यकर्त्यांची मेहनत दिसून येत आहे. या स्पर्धांमधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. यावेळी गावचे खोत सुनिल नाडकर्णी यांनी मार्गदर्शन करत क्रिकेटच्या चांगल्या क्रिडांगणाची मागणी केली.
या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे पहिले पारितोषिक १ लाख १११ रूपये, दुसरे पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये आहे.पहिल्या दिवशी विविध संघांमध्ये ५ सामने रात्री उशिरापर्यंत रंगले. त्यामध्ये शिवारा सुपर कणकवली व तनोज स्पोर्टस सावंतवाडी हे दोन संघ पुढील फेरीत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी केले.