
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लस साठवण केंद्राकरीता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन लस वाहन प्राप्त झालेले आहे. हे वाहन पूर्णपणे उष्णतारोधक असून राज्यस्तरावरील तसेच उपसंचालक स्तरावरील लस साठवण केंद्राकडून प्राप्त होणारा लस साठा सुरक्षितपणे जिल्हास्तरावरील लस साठवण केंद्रामध्ये आणणे यापुढे सोयीचे होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांना सदरील लसीचे योग्यवेळी सुरक्षितपणे वाटप करणे सोयीचे होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
भारतामध्ये विस्तारीत लस टोचणी कार्यक्रम हा सन १९७८ मध्ये सुरु करण्यात आला. सन १९९७ मध्ये हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रम सुरु झाल्यानंतर सदरील कार्यक्रम हा या कार्यक्रमाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा एक महत्वाचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम असून त्यामध्ये दरवर्षी देशातील सुमारे २.६७ कोटी नवजात बालके व सुमारे २.९ कोटी गरोदर मातांच्या लसीकरणाचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. हा एक आर्थिकदृष्टया प्रभावी आरोग्य उपक्रम असून याद्वारे ५ वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण लसीकरणाद्वारे कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये लसीकरणाद्वारे रोखता येणाऱ्या १२ आजारांचे मोफत लसीकरण करण्यात येते. या मध्ये धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, पोलिओ, गोवर, रुबेला, क्षयरोग, हिपॅटायटीस बी, न्यूमोनिया इ. आजारांचा समावेश आहे. यामध्ये पोलिओचे समूळ उच्चाटन तसेच गरोदरपणातील व नवजात बालकांतील धनर्वाताच्या समूळ उच्चाटनाचे उद्दीष्ट साध्य झालेले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच हे सर्व साध्य झालेले आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शीतसाखळी अबाधित राखून योग्य गुणवत्तेची लस पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये राज्यस्तरावरील लस साठवण केंद्रातील लस जिल्हास्तरावरील लस साठवण केंद्रामध्ये सुरक्षित पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये योग्य प्रकारच्या लस वाहनाची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. हे वाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उपलब्ध झाले असून राज्यस्तरावरील तसेच उपसंचालक स्तरावरील लस साठवण केंद्राकडून प्राप्त होणारा लस साठा सुरक्षितपणे जिल्हास्तरावरील लस साठवण केंद्रामध्ये आणणे यापुढे सोयीचे होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांना सदरील लसीचे योग्यवेळी सुरक्षितपणे वाटप करणे सोयीचे होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.