
सावर्डे : सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कायदा निर्माण झाला आहे.नवीन कायद्यानुसार रस्त्यावरील सीसीटीव्ही, कॅमेरे, मोबाईल मधील रेकॉर्डिंग, व्हिडिओ या सर्व बाबी प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून स्वीकारण्याचं निश्चित करण्यात आले असून हा बक्कळ पुरावा असतो याची माहिती आपल्या सर्वांना आवश्यक आहे. आज पर्यंत स्त्री व पुरुष यांच्यासाठी कायदा निश्चित होता मात्र आज तो तृतीयपंथी यांनाही तेवढाच समान हक्क आहेअसे प्रतिपादन कायदेतज्ञ चिन्मय दीक्षित यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे सावर्डे पोलीस स्टेशनच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या कायद्या संबंधीचे बदल याविषयीचे व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते कायदा तज्ञ चिन्मय दीक्षित, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, तसेच सावर्डा पोलीस स्टेशनचे सुजाता मोहिते,बिरुदेव कोळेकर,सतीश कदम, सुनिल भांगरे,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात पुढे माहिती देताना कायदेतज्ञ चिन्मय दीक्षित यांनी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्याविषयी माहिती दिली. गावचे पोलीस पाटील हे पोलिसांचे प्रतिनिधी असतात ते दुवा म्हणून काम करतात त्यामुळे त्यांचा पुरावा हा भक्कम पुरावा म्हणून विचारात घेतला जातो. याप्रसंगी भारतातील बदललेले कायदे, गुन्ह्यांची गंभीरता, दंड, विविध कायद्यांची नावे यामध्ये इंडियन क्रिमिनल बोर्ड,हिट अँड रन, ऑर्गनाईज क्राईम, स्नॅचिंग याविषयी कायद्यात झालेले नवनवीन बदल,. ऑनलाइन फ्रॉड, गँगरेप, गुन्हेगारांच्या शिक्षा या विषयी सविस्तर माहिती दिली. पब्लिक सर्विस मध्ये गुन्हेगाराला गावातच काम देऊन त्याच्यावर सरपंच व पोलीस पाटील लक्ष ठेवत असतात यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल असे कायदे तज्ञांचे मत आहे म्हणूनच पब्लिक सर्विस अतिशय महत्त्वपूर्ण आहे . त्याचप्रमाणे या बदललेल्या सर्व कायद्याची पायाभूत माहिती व्याख्याते चिन्मय दीक्षित यांनी दिली.शेवटी सावर्डे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत काकडे यांनी केले.