
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, स्थानकास प्रा. मधु दंडवतेंच नाव आणि गाड्यांना थांबे मिळावे यासह कोकण रेल्वे संबंधित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे पेज बनवले आहे. या पेजद्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर, तेजस पोयेकर यांनी पोस्ट, लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबंधितील समस्या मांडून जनजागृती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर व्हिव्स, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. "कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची" अशा आशयाची फलक मोहीम "कोकणवाचवा” आणि "Save KokanRailway” या हॅशटॅग सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेजवर पोस्ट केले होते. या मोहीमेला पाठिंबा दर्शविण्यासाठी चळवळीत सामील व्हा असं आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.