नेमळे हायस्कूल जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था : व्हीक्टर डांट्स

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 11:53 AM
views 228  views

सावंतवाडी : देशाचे चांगले नागरिक हे शाळेतच घडतात. मुलांनी थोर व्यक्तीची चरित्रे वाचल्याने आपण तसे घडू शकता व यशस्वी नागरिक होऊ शकता. जिल्ह्यातील समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार तर गुणी शिक्षकांच्या गुणांची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणारी ही जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था आहे असे उद्गार नेमळे हायस्कूल मध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे व्हीक्टर डांट्स यांनी काढले.

यावेळी नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ भी राऊळ यांच्या हस्ते कै तात्यासाहेब पोकळे स्मृती आदर्श समाजभूषण पुरस्कार ऍड संदेश तायशेटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी तायशेटे यांनी मी जिंकणार आहे आणि त्याबरोबर इतरही जिंकले पाहिजे असा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असं सांगितलं. यावेळी कै प्रमिला जाधव स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ स्नेहलता राणे जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी ता वैभववाडी यांना माजी प्राचार्या रेश्मा भाईडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यानंतर गुरुवर्य कै ज. भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार समीर चांदरकर, वराडकर हायस्कूल कट्टा ता मालवण यांना नेमळे हायस्कूल च्या प्राचार्या सौ कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते समीर चांदरकर हे  नवोपक्रम स्पर्धेसाठी पुणे येथे गेल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ सिमरन चांदरकर यांनी स्वीकारला. यावेळी दहावीतील आदर्श विद्यार्थी आर्यन गोवेकर, आदर्श विद्यार्थिनी प्रणया राऊळ, बारावीतील आदर्श विद्यार्थी राजेश बिर्जे, आदर्श विद्यार्थीनी गौरवी खोत तसेच कला क्रीडा क्षेत्रात चमक दाखविलेल्या विद्यार्थ्यांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभू तेंडोलकर, सचिव स. पा. आळवे.तुकाराम गुडेकर,नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे,उपसरपंच सखाराम राऊळ.वजराठ सरपंच सौ अनन्या पुराणिक,माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष महादेव राऊळ,तुळसकर सर, भानुदास गावकर,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक परिचय प्राचार्या सौ कल्पना बोवलेकर यांनी केले. अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी केले.सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले आभार लवू जाधव यांनी मानले.