सावंतवाडीच्या पदरी उपेक्षाच : सागर तळवडेकर

Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 19:13 PM
views 296  views

सावंतवाडी : रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे. यामध्ये सावंतवाडीकरांची मागणी असलेली मंगला,मंगलोर,वंदे भारत,नागपूर - मडगाव,मत्स्यगंधा,नेत्रावती आणि कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी आणि गरीबरथ एक्सप्रेस संदर्भात काहीच निर्णय झाले नसल्याचे उघड झाले आहे. सावंतवाडीकरांचा मागण्यांना केराची टोपली दाखवली असेच दिसते असं मत रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले आहे.


अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि प्रवासी संख्या असूनही सावंतवाडीकरांवर अन्याय सुरूच आहे. पहिल्यांदा झीरो टाईम टेबलच कारण देऊन त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि एलटीटी कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे काढून घेण्यात आले. त्यानंतर नागपूर मडगाव या स्पेशल गाडीचा थांबा देखील या स्थानकातून काढून घेण्यात आला.या स्थानकात दोन महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देखील नाकारण्यात आला होता. येथील टर्मिनसच काम देखील ठप्प आहे. या सर्व बाबींवर अलीकडेच काही प्रवासी संघटनांनी देखील पाठपुरावा केला होता. परंतु रेल्वे बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत या स्थानकात स्वर्गीय डी के सावंत यांचा पुढाकाराने मंगला आणि मंगलोर एक्सप्रेसला थांबा कोकण रेल्वे चे संचालक श्री. गुप्ता यांनी तत्वतः मान्य केला होता.

तसेच येथे वंदे भारत, नेत्रावती, मत्स्यगंधा, नागपूर मडगाव, मंगलोर, मंगला या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील सुरू आहे. परंतु, प्रवासी आणि प्रवासी संघटनांची उदासीनता देखील या थांब्याना येथे मंजुरी न मिळण्यास कारणभूत असू शकते, अस मत सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले.