सरत्या वर्षात नील बांदेकरची धमाकेदार कामगिरी | बक्षिसांचा वर्षाव

Edited by: ब्युरो
Published on: January 04, 2023 11:40 AM
views 209  views

बांदा : केंद्र शाळा बांदा नं. 1 चा  इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने वर्षाअखेरीस अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. यात दोडामार्ग आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

याच स्पर्धेदरम्यान त्याला सोनी मराठीच्या मालिकेसोबत एका महानाट्यासाठी तसेच मुंबई मेड वेबसिरीज साठी संधी चालून आली. तसेच फ्लोरिडा अमेरिका आयोजित चित्रकला स्पर्धेतही तो अव्वल ठरला. त्याचबरोबर ज्ञानी मी होणार या स्पर्धेत नील, केंद्र आणि बिट मध्ये साहील कोळापटे या जोडीदारासोबत  प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.तसेच तालुका स्तरावरील ज्ञानी मी होणार मध्ये फक्त एका मार्क्सच्या फरकामुळे द्वितीय क्रमांकाचा शिलेदार ठरला. त्याचबरोबर डॉट कॉम आयोजित वाचन स्पर्धेतही तो राज्यात प्रथम आला.

नीलच्या यशाचा आलेख उत्तरोत्तर वाढतच जात आहे. नीलने आतापर्यंत कमाविलेल्या बक्षिसांची संख्या सुमारे १२१  एवढी झाली आहे. चित्रकला, रंगभरण, गायन, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग, निबंध, हस्ताक्षर यात त्याचा हातखंडा आहे. कोणत्याही एकाच प्रकारच्या स्पर्धेत अडकून न पडता नील सर्वच स्पर्धेमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत आहे. तसेच तो तबला, गिटार, कोंगो अशी वाद्ये वाजविण्यातही तरबेज आहे.


त्याच्या या यशात त्याला बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षकवर्ग, आई - वडील, तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले . नीलवर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.