चिपळूणमध्ये एनडीआरएफचे प्रशिक्षण शिबिर

Edited by: मनोज पवार
Published on: June 28, 2025 16:42 PM
views 50  views

चिपळूण :  दरवर्षी पावसाळ्यात पुराचा सामना करणाऱ्या चिपळूण शहरातील नागरिकांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तर्फे आज जलतरण तलावात विशेष आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, चिपळूण नगर परिषद आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात बचाव कार्यातील प्रत्यक्ष कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

शिबिराचे नेतृत्व एनडीआर एफचे कमांडर इन्स्पेक्टर प्रमोदकुमार राय यांनी केले. त्यांनी उपस्थित नागरिकांना पूरस्थितीत आत्मरक्षण, बचाव कार्यातील प्राथमिक उपचार, आणि टीमवर्क या बाबींचे महत्त्व पटवून दिले. एनडीआरएफचे शरद साखरे यांनी पूर काळात वापरल्या जाणाऱ्या साहित्यांची सविस्तर माहिती दिली, तर सतीश देसाई, हनुमान बर्डे, सचिन मोरे, रवींद्र पवार, सतीश ढोबळ, तंबोली अकबर, राजेंद्र घोणके यांसह इतर जवानांनी पाण्यातील बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर केली.

विशेष म्हणजे, नारळपाण्याच्या बाटल्या, थर्माकोल यांसारख्या सहज उपलब्ध वस्तूंच्या मदतीनेही बचाव कार्य शक्य आहे, याचे प्रभावी प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीस वाचवणे, आग लागल्यास मार्ग कसा शोधायचा, तसेच CPR (हृदयक्रिया बंद पडल्यास प्राथमिक उपचार) याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आले.

या प्रसंगी तहसीलदार प्रवीण लोकरे, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, जलतरण तलाव व्यवस्थापक प्रीतम जाधव, तसेच नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी व बोट चालक यांची उपस्थिती होती.

ग्लोबल चिपळूण टुरिझमचे विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, आशुतोष जोगळेकर, प्रभाकर चितळे, समीर कोवळे यांच्यासह नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या प्रशिक्षणामुळे चिपळूण शहर आपत्तीच्या प्रसंगी अधिक सजग व सक्षम राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.