अनंतराज पाटकर यांनी बांधले हाती घड्याळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश | गडहिग्लजमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व आबिद नाईक यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
Edited by:
Published on: August 24, 2025 11:35 AM
views 258  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गडहिंग्लज येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. या सर्वांच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यालयात स्वागत झाल.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये कुडाळ- मालवण विधानसभा २०२४ चे  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार व कोकण विभागाचे युवा स्वाभिमानचे अध्यक्ष अनंतराज पाटकर, रासपाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला विजय येळावीकर, रासपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विजय येळावीकर, कणकवली तालुकाध्यक्ष नंदकुमार महाडिक, कणकवली तालुका महिला अध्यक्षा सौ. स्नेहा महाडिक, कणकवली तालुका युवा अध्यक्ष सौरभ महाडिक, कुडाळ युवाध्यक्षा वृषाली येळावीकर, देवगड तालुका महिला अध्यक्षा अर्चना जोशी, जितेंद्रकुमार महाडिक, मोनिका कदम, मोनाक्षी कदम, राकेश नेरुरकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दीपक हेब्बाळकर, कोकण युवा स्वराज्याचे सचिव अर्जुन सातोसकर, पदवीधर अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, रोशन कदम, श्रावण ढेरे, रोशनी पेंढूरकर, युवराज खराडे आदी प्रमुखांचा सहभाग आहे.       

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. या सर्वांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे पाठबळ मिळाले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये येऊन चूक केली असं तुम्हाला आयुष्यभर वाटणार नाही, अशा प्रकारचा मानसन्मान आणि वर्तन राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आपल्याशी करतील. सिंधुदुर्ग जिल्ह्याशी माझा नेहमीचा संपर्क राहील.  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आम्हा सर्वांचीच श्रद्धा आहे. कै.  यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचार घेऊन आम्ही राज्यामध्ये काम करीत आहोत.

यावेळी बोलताना अनंतराज पाटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पक्षाने समाजातील विविध घटकांसाठी उचललेली पावले आणि त्यांचं कार्य नेहमीच आदर्शवत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला दिशा मिळाली आहे, जी पक्षाला अधिकाधिक जनाधार देत आहे. तसेच, आपल्या नेतृत्वाखाली प्रदेशात पक्षाचा विस्तार व जनतेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. मला पक्षाची विचारधारा अत्यंत समर्पक वाटते.  म्हणनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सक्रिय सदस्य होऊन काम करणार आहे.

माझा विश्वास आहे की, माझा सामाजिक व राजकीय अनुभव पक्षाच्या कार्याला निश्चितच उपयुक्त ठरेल. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पक्षाची धोरणे आणि विचार पोहोचवण्याचे काम मी प्रामाणिकपणे पार पाडेन. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक यांनी आभार मानले.