
दोडामार्ग : कसई दोडामार्ग शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालल्याने रस्त्यावर वाढणाऱ्या अपघातांची संख्या व व्यापारी व्यावसायिक आणि नागरिक यांच्यासाठी ही समस्या डोखेदुखी ठरत आहे. ही समस्या सुटावी यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आक्रमक झालाय. नुकतीच सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या रविकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले आहे.
यावेळी गवस म्हणाले की, दोडामार्ग शहरातील चारही मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत असल्याचे ठणकावलं. गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेला असताना, रात्रीच्या वेळेस मोकाट जनावरांमुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक आहे. इतकंच नव्हे तर हीच जनावर व्यापारी व्यावसायिक यांच्या दुकानात, व्हारंड्यात घुसून नुकसान करतात, तसेच नासधूस व घाण करतात. त्यामुळं ही समस्या नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या मोकाट जनावरांच्या प्रशासनाकडे दंडात्मक कारवाईची मागणी करत त्वरीत उपाययोजना करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या भेटीदरम्यान तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी यावेळी सांगितले की, मोकाट जनावरांवर घंटागाडीमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच शहरात गोशाळा सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, युवा अध्यक्ष गौतम महाले, तसेच उल्हास नाईक यांनीही प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली.