
सावंतवाडी : पालकमंत्री यांच्या उपस्थितीत गुरूवारी होणाऱ्या रूग्णसेवा लोकार्पण सोहळ्यासाठी शहरातील शिव उद्यान ते राणी पार्वती देवी हायस्कूल रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून प्रवाशांना अर्ध्या वाटेतून माघारी फिरावे लागत आहे. पोलिस देखील येथे उपस्थित नसल्याकारणाने भाजपकडून लोकसेवेसाठी कार्यक्रम घेतले जातात की लोकांना त्रास देण्यासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले आहे.
लोकोपयोगी उपक्रमाला आमचा विरोध नाही. परंतु, या कार्यक्रमामुळे लोकांना त्रास होऊ नये याचीही दक्षता घेणे आवश्यक होते. ती घेतली न गेल्याने भाजपकडून लोकसेवेसाठी कार्यक्रम घेतले जातात की लोकांना त्रास देण्यासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून अर्ध्या रस्त्यावर व्यासपीठ उभारण्याचे परवानगी कशी दिली ? त्यात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम असताना बुधवारपासून रस्ता बंद करणे योग्य नाही. प्रशासक म्हणून कारभार हाकणाऱ्या मुख्याधिकारी यांनी सावंतवाडी कोणापुढे आंदण म्हणून ठेऊ नये, सावंतवाडीकर काही बोलत नाहीत याचा गैरफायदा घेऊ नये. नगरपरिषद व सावंतवाडी पोलीसांकडून तात्काळ हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे.