राष्ट्रवादीनं फुंकली 'तुतारी', शिवसेनेनं पेटवली 'मशाल' !

श.प.ची 'जाणीव जागर' तर उबाठाची 'शिवसेना संपर्क' यात्रा !
Edited by: विनायक गावस
Published on: August 16, 2024 04:40 AM
views 138  views

एकाच दिवशी दोघांच्या यात्रेला प्रारंभ 

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'जाणीव जागर यात्रे'चा शुभारंभ वेंगुर्ला येथून आजपासून होत आहे. रेडी येथील द्विभूज गणपतीच दर्शन घेऊन शिरोड्यातील सत्याग्रहाच्या ठिकाणापासून या यात्रेला प्रारंभ होत आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने 'शिवसेना संपर्क यात्रे'ची सुरूवात सावंतवाडीतून होत आहे‌. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून याचा आरंभ होत आहे. इंडिया आघाडीचे हे दोन घटक पक्ष असून दोघांकडूनही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर दावा केला गेलाय. अशातच एकाच दिवशी दोन्ही पक्षांच्या यात्रांना प्रारंभ होत आहे. यात राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार, उद्धव ठाकरे, राहूल गांधी या इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो दिसत आहेत. मात्र, उबाठा शिवसेनेच्या बॅनरवर गांधी, पवारांना स्थान नसल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात. 


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाणीव जागर यात्रे'चा रेडी येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन पहिला थांबा हा शिरोड्यातील सत्याग्रहाच्या ठिकाणी असणार आहे. सत्याग्रह ठिकाणापासून सुरूवात होत आहे‌. यात्रेतून आपल्या हक्काच्या जाणीवांचा जागर करत ते हक्क प्राप्त करण्यासाठी शांततेच्या, अहिंसेच्या आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न करणार असल्याच कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी म्हटले आहे. सकाळी १० वा. सुरू होणारी ही यात्रा आज सायंकाळी ६ वा. वेतोबा मंदीर आरवली येथे विश्रांती घेणार आहे.


दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ सुरू होत आहे. आज कोलगाव जिल्हा परिषद गटापासून याची सुरुवात होत आहे. विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. कोलगाव येथून स. ९.३० वा. सुरू होणारी ही यात्रा सायं. ७.३० वा. शिरशिंगे गावात विश्रांती घेणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी श.प.नं 'तुतारी' फुंकल्याची तर शिवसेना उबाठानं 'मशाल' पेटवल्याचं दिसत आहे.