
कणकवली : पुरोगामी विचार आणि सामाजिक कामावर निष्ठा असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ मिळाले आहे. नव्यांना योग्य मानसन्मान देण्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांना ताकद देत योग्य मान सन्मान दिला जाईल. राष्ट्रवादी प्रवेश करून कार्यकर्त्यांनी चूक केली असे कधीही वाटू देणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, सावतंवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष उर्फ बाबू सावंत, संदीप राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, युवक जिल्हाध्यक्ष निशीकांत कडुलकर, दिपक देसाई, केदार खोत, विशाल पेडणेकर, तसेच गडहिग्लज येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये कोकण युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंतराज पाटकर, रासपच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्वला येळावीकर, रासपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विजय येळावीकर, युवाध्यक्षा वृषाली येळावीकर, कणकवली तालुकाध्यक्ष नंदकुमार महाडिक, महिला तालुकाध्यक्षा स्नेहा महाडिक, शिवेंद्र महाडिक, कणकवलीचे युवा अध्यक्ष सौरभ महाडिक, कणकवली उपाध्यक्षा अर्चना जोशी, दिपक हेबाळकर, अर्जुन सातोस्कर, हरिश्चंद्र जाधव, मोनिका कदम, राखी नेरूरकर, मिनाक्षी कदम, रोशनी पेंडूरकर, मारूती खराडे, फोंडा विभाग अध्यक्ष श्रावण ढेरे, रोशन कदम आदींसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शिव-शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच पक्षाची वाटचाल सुरू असून राज्याचा विकास आणि पक्षाच्या विस्तारासाठी राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी झाला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुती म्हणूनच लढविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
सांगली प्रमाणेच आपण सिंधुदुर्गचा संपर्क मंत्री असून नियमित संपर्क ठेवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डींनना कामात सुधारणा करण्याबाबत सूचना देऊ प्रसंगी गरज भासल्यास बदलीही केली जाईल, अशी ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली. तसेच गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अबिद नाईक म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढीचे काम जोरात सुरू आहे. जिल्हयात पक्षाचा एकही आमदार, खासदार नसताना पक्षसंघटना टिकविण्याचे काम आम्ही करत आहोत. संपर्कमंत्री म्हणून श्री. मुश्रीफ यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा जिल्हा मेळावा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विचार जनमानसात पोहोचविण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.