दिलीप भालेकर यांना 'राष्ट्रीय समाजभूषण' पुरस्कार जाहीर !

अखिल भारतीय धोबी (परीट) महासंघाची घोषणा
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 12, 2023 16:50 PM
views 192  views

सावंतवाडी : अखिल भारतीय धोबी (परीट) महासंघाच्या वतीने परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना 'राष्ट्रीय समाजभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परीट समाजात काम करत असताना दिलीप भालेकर यांची पहिल्यांदा १९९३ मध्ये तालुका सरचिटणीस म्हणून निवड झाली. त्यानंतर लॉन्ड्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल २००५ साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. गेली १७ वर्षे ते समाजासाठी अविरत काम करत आहेत. ते काम करत असताना जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व समाज बंधू - भगिनींनी त्यांना चांगले सहकार्य केले. त्यामुळेच या सर्वांच्या सहकार्यातून त्यांना हा 'राष्ट्रीय समाजभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.

परीट समाजाचे अविरत काम करत असताना त्यांनी २००६ साली श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांची सावंतवाडी शहरात सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेऊन गाडगेबाबांच्या विचारांची प्रबोधन यात्रा काढली होती. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 'करो या मरो' आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. हे आंदोलन परीट समाज एस. टी.  या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी होते. अजूनही त्या संदर्भात न्यायालयीन लढा चालू आहे. तसेच समाजातील गरजू व  गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप आजतागायत चालू आहे. अशा अनेक प्रकारे केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल दिलीप भालेकर यांना 'राष्ट्रीय समाजभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.