पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय 'भास्कर भूषण अवॉर्ड' जाहीर

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 12, 2023 17:54 PM
views 157  views

बांदा : बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा 'भास्कर भूषण अवॉर्ड' जाहीर झाला असून २८ मे रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी-गोवा येथील रवींद्र भवन नाट्यगृह येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. दुहेरी पुरस्कार सन्मानाने त्यांचे अभिनंदन होत आहे.

    श्री. मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग आहे. ते येथील बांदा केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा बनली आहे. येथील नट वाचनालयचे ते संचालक आहेत. बांदा मराठा समाजाचे संस्थापक असून मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.

त्यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भास्कर भूषण अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे.