
बॅरिस्टर नाथ पैंच्या जन्मशताब्दी निमित्ताने वेंगुर्ला येथे त्यांची नात आदिती पै यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमावेळी बॅरिस्टर नाथ पै यांचे ९६ वर्षे वयाचे सहकारी श्री विठ्ठल याळगी यांनी अगदी खणखणीत आवाजात एक किस्सा सांगितला !
नाथ पै संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय होते. त्यांचे वास्तव्य बेळगांवमध्ये याळगींच्या घरीच अधिक असे . त्याकाळी गाड्या मोटारसायकली क्वचित असत, सर्वसामान्य तरूणांसाठी सायकल हेच प्रवासाचं साधन असे. एके दिवशी एका महत्वाच्या कामानिमित्ताने याळगी नाथ पै ना सायकलच्या मागच्या कॅरेजवर घेऊन निघाले. निघेपर्यंत अंधारलं होतं . त्याकाळी सायकलला पुढे दिवा असणे बंधनकारक होते आणि डबलसीट नेण्यास परवानगी नव्हती. याळगींची सायकल दोन्ही नियम मोडून एका चौकातून जात असताना एका पोलीसाने शिट्टी मारली. पण घाई असल्याने याळगींनी सायकल तशीच पुढे दामटली. पोलिसांच्या भाषेत ‘अंधाराचा फायदा घेऊन , पोलिसांना गुंगारा देऊन’ पसार झाली.
दूसऱ्या दिवशी नाथ पै याळगींना म्हणाले, “विठ्ठल, आपल्याला कामाची घाई होती हे खरे ! पण त्यासाठी आपण नियम मोडला हे गैर आहे. आपण पोलिस स्टेशनला जाऊन चुकीची कबुली द्यायला हवी. “ नाथ पै याळगींसह पोलिस स्टेशनमध्ये हजर देखील झाले . पै नी घडलेला प्रसंग सांगून जी काय शिक्षा ती भोगण्यास अथवा दंड असेल तो भरण्यास तयार असल्याचे सांगितले .
ठाणे अंमलदार अवाक झाला ! नियम मोडून गेलेला पुन्हा हजर झाल्याचे तो पहिल्यांदा पाहत होता. पैं नी तो दंड भरला.
कामाच्या अगतिकतेमुळे नाथ पै यांचा संयम किंचितसा ढळला असेल पण सचोटीला तोड नव्हती. सचोटी ही त्यांची जीवन निष्ठा होती.
हा किस्सा ऐकून मधूसुदन कालेलकर सभागृहातील प्रेक्षक भारावले. मी ही भारावलो. नंतर माझ्या डोळ्यांसमोर बिनदिक्कत सिग्नल तोडून जाणारे , टोल नाक्यावर फुकट निघून जाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे घमेंडखोर उभे राहिले !
(बॅ. नाथ पै यांची त्यांचे सहकारी श्री याळगी यांनी सांगितलेली आठवण. श्री सतीश राऊत यांचे वॉलवरुन.. साभार : अर्चना परब - घारे )