
कणकवली : पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे धरण प्रकल्पाच्या कामला ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा तीव्र विरोध केला. शेकडो ग्रामस्थ एकत्रित ठेकेदार कंपनीच्या कार्यालया बाहेर ठिय्या दिला. संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचे आव्हान पोलीस आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा असे प्रकल्पग्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले आहे.
यापूर्वी नरडवे प्रकल्पग्रस्तांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यात त्याच मागण्या या प्रकल्पग्रस्तानी आजही मांडल्या. यात संकलन रजिस्टर अद्यावत करणे, पर्यायी शेतजमिनीसाठी ज्या खातेदारांनी ६५ टक्के रक्कम भरलेली आहे. तसेच पर्यायी जमिनीसाठी इच्छा प्रकट केलेली आहे. असे एकूण ३४७ खातेदारांची यादी असून यामध्ये काही खातेदारांना कुटुंबाची व्याख्या लावून काही खातेदारांमध्ये महिरपी कंस घालून ३४७ ऐवजी २९९ ची यादी बनविलेली आहे आणि ती ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे व ती आम्हा प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही. तरी ३४७ खातेदारांना स्वतंत्र जमिन अथवा विशेष आर्थिक पॅकेजचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे.
स्वेच्छा पुनर्वसन ज्या १५२ खातेदारांनी मागितलेली आहे, त्यांचे अनुदान केव्हापर्यंत मिळणार, याची प्रकल्पग्रस्तांना हमी द्यावी. वाढीव २३४ कुटुंबाना शासन नियमांनुसार भूखंड अथवा अनुदान कधीपर्यंत मिळणार याची हमी द्यावी. पुर्नवसन गांवठाणमध्ये काही कामाना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्णपणे ठप्प आहेत आणि नरडवे प्रकल्पाचे काम मात्र जोरात चालू आहे. हे असा जाब यावेळी प्रकल्पग्रस्तांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीला विचारलेला आहे.
दरम्यान नरडवे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री कदम आणि पोलीस निरीक्षक जाधव हे प्रकल्प ग्रस्थासोबत चर्चा करत आहेत .