भाजप बंजारा समाजाच्या कायम पाठीशी : नारायण राणे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 07, 2024 17:03 PM
views 141  views

कुडाळ : हा ऐतिहासिक मेळावा असून तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे, तुमच्या समाजात बदल होण्यासाठीच हा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे, त्यात तुम्ही भाजप पक्षावर दाखविलेला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा आहे. एकाही बंजारा समाजाला या पक्षप्रवेशानंतर त्रास झाला तर कॉल करा भारतीय जनता पार्टी सदैव तुमच्या पाठीशी उभी असेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी गोर बंजारा समाज पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, श्वेता कोरगावकर, संजय वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गोर बंजारा समाज अध्यक्ष प्रकाश पवार, बंजारा समाज महिला जिल्हाध्यक्ष सुनीता राठोड उपाध्यक्ष रमेश राठोड, सचिव दिनेश चव्हाण, सहसचिव बाबू राठोड, खजिनदार काशिनाथ पवार, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह  बंजारा समाजातील हजारो बांधवानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश  कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे  पुष्पवृष्टी करत बंजारा समाजाकडून स्वागत करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंजारा समाजाच्या वतीने  पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. तर या कार्यक्रमाची सुरुवात  दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संत सेवालाल महाराज यांना पुष्पहार घालून करण्यात आली.

 यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अठराव्या शतकात आपला समाज या भागात आला, आपल्या समाजापैकी काही लोक व्यावसायिक बनले तर अजूनही काही लोक व्यवसायापासून व इतर साधन सामग्री पासून  मागे राहिले आहेत. मात्र आता भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी असून तुमच्यातील कोणतरी ज्यावेळी मोठा व्यावसायिक बनेल त्यावेळीच  या पक्षप्रवेशाचे खरे सार्थक होईल. असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

 मी मुंबईतील बंजारा समाज जवळून पाहिला आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंजारा समाज जवळून अनुभवायचा आहे यासाठी  मी लवकरच विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत येईन अशी ग्वाही केंद्रीय मंत्री राणे यांनी दिली, तर यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी मागच्या अडीच वर्षात काय दिले, कोकणात किती उद्योग आणले, आदित्य ठाकरे यांच्याकडे आक्रमकता आहे का असा प्रश्न उपस्थित करत यांनी फक्त कोकणातून मासे खाल्ले व निघून गेले अशी टीका केली.

 तर यावेळी व्यासपीठावरून बोलताना निलेश राणे यांनी मी आपल्याला शब्द देतो तुमच्या बंजारी समाजाचे जे प्रश्न असतील ते आमचा पक्ष सोडवेल, बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात घेणे हा भारतीय जनता पार्टीचा मुख्य हेतू असेल असे सांगत. मला समजले 80 वर्षाच्या एका माणसाने धमकी दिली त्याने खरं आशीर्वाद देणे गरजेचे होते, तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला धमकी म्हणजे आम्हाला धमकी दिल्यासारखे आहे त्यामुळे आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही आम्ही हिशोब याच जन्मात चुकता करतो तुम्ही फक्त कॉल करा मी पुढचे काय ते बघतो तुमच्याबरोबर राणे कुटुंब सदैव असेल असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

बंजारा समाजातील महिलांना विशेष स्थान

बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक विषयात नृत्य करण्यात आले, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बंजारा समाजातील पारंपारिक वेशातील महिलांना व्यासपीठावर स्थान दिल्याने बंजारा समाजाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या कृतीबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.