खासदार आमचा असेल : नारायण राणे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 04, 2024 19:19 PM
views 296  views

कुडाळ : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघावर भारतीय जनता पार्टी आपला अधिकार सांगेल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले ते कुडाळ भाजप कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.खासदार आमचा असेल. आता जे टिवटिव करता आहेत ते बंद होईल. या जागेवर भाजप अधिकार सांगेल, आता कोणतीही कुस्ती नाही, खो खो नाही, कबड्डी नाही. आमच्याकडे जे होईल ते सामोपचाराने होईल. जो उमेदवार असेल तो नक्की १०० टक्के जिंकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला.


केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवारी कुडाळ येथील भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, आणि नागरिकांची निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजन तेली,रणजीत देसाई, संजू परब, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, प्राजक्ता बांदेकर आदी उपस्थित होते.


 यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीराम यांच्यावरील वक्तव्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, आव्हाड आणि मातोश्री बद्दल काही बोलायचे नाही. ते सध्या घसरलेत. सत्ता गेल्याने ते डिप्रेशनमध्ये आहेत. आमच्या देवतांवर त्यांनी बोलायचे धाडस करू नये. मग त्यांना शेवटी राम करावा लागेल. असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.


तर राष्ट्रवादीच्या शिबिरात आज अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, आपल्या विचारांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीचा वापर करून दबाव आणला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मला पवार साहेब काय बोलले ते माहीत नाही. ते जेष्ठ नेते आहेत. ते काय बोलले ते मी खात्री करेन. मात्र, आमचे सरकार काँग्रेस राजवटीपासून ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई होत आहे.

 तर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत बोलताना अनिल देशमुख हा काय साधुसंत नव्हता ! महिन्याला पैसे मागत होता, त्याचे पुरावे मिळाले आहेत. ईडी त्या आधारे चौकशी करते आहे, शरद पवारांना वाईट वाटायची गरज काय ? ते दिल्लीत असताना काही बोलायाचे नाहीत. आम्ही त्यांना विरोधक म्हणून पाहत नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.


महानंद प्रकल्पाबाबत संजय राऊत यांनी आरोप केला होता त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत पागल झाले आहेत, सहा महिने महानंदच्या कामगारांना पगार नाही, मी याबाबत आता प्रस्ताव ठेवलाय की, एनडीबीने महानंद चालवायला घ्यावं असं मी या प्रस्तावात म्हटले आहे, तरच संपूर्ण भारतभर महानंदाचे दूध पोहोचू शकेल. व कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळतील म्हणून मी हा प्रस्ताव पाठवला आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.