
कणकवली : समाजातील मतभेद विसरा आणि विकसासाठी योगदान द्या. सिंधुदुर्गातील मराठा उद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारी नवी पिढी यांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांना आणखीन बळ द्या. समाज येतो तेथे राजकारण असू नये.मनभेद नको. सर्व पक्षीय आले पाहिजेत. समाजातील तरुण पिढीला पुढे आणले पाहिजे.समाजातील गरीब,कुपोषित,आजारी, बेरोजगार अशा गांजलेल्या समाज बांधवांना मदतीचा हात देऊन पुढे घेतले पाहिजे.मराठ्यांचे नेतृत्व तयार केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज सेवा घडेल.भारत महासत्तेकडे झेप घेत असताना मराठा समाजाचेही योगदान असायला हवे असे आवाहन माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रिय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळ कणकवली येथील वार्षीक सर्वसाधारण सभेत ते व्यासपीठावरुन मार्गदर्शन करत होते. यावेळी प्रा. जी.ए. सावंत,डॉ.चंद्रकांत राणे, प्रभाकर सावंत, विजय सावंत, तुळशीदास रावराणे, अॅड. उमेश सावंत,शशी सावंत तसेच मंडळाचे अन्य मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, सर्व क्षेत्रात मराठा समाज पुढे असला पाहिजे. मुंबई मध्ये २२ टक्के मराठी माणूस होता. तो टक्का कमालीचा घसरला त्यात मराठा किती आहेत हे शोधले पाहिजे. आज मराठा समाज पुढे नेण्याचे ध्येय ठेवताना भाऊबंदकीच्या भांडणांना बाजूला सारले पाहीजे. समाजातील यशस्वी व्यक्तिमत्वांचा गौरव करुन शाबासकी द्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि स्वराज्य उभे केले. त्यासाठी मोठे कष्ट घेतले. अहोरात्र मेहनत केली. त्यांनाही समाजाकडून त्रास झाला पण तो त्यांनी बाजूला केला.आपण त्यांची जयंती साजरी करतो...अगदी धुमधडाक्यात, म्हणजे झाले का? त्यांचे विचार , त्यांची प्रेरणा घेऊन आपण उभे कधी होणार आहोत? आजची पीढी किती वाहवत चालली आहे? याकडे लक्ष द्यायला हवे.
आपण लढणारा माणूस आहे. त्यामुळे मराठा समाजाची घसरणारी स्थिती असू नये असे मला वाटते. नारायण राणे यांना उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी पन्नास वर्षे लागली.अनेक संकटे आली. ज्यावेळी व्यवसायात उतरलो तेव्हा घरातून प्रचंड दबाव होता. व्यवसाय करणे आपले काम नाही असे सुनावले जात होते पण निर्धाराने उभे राहिलो. आज माझ्या व्यवसायांची चर्चा होते.पण त्यामागची मेहनत लक्षात घ्यायला हवी.
मराठा समाजातील युवकांची चर्चा सत्र ठेवा. आपण त्यात भाग घेऊ.नव्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करू. मोबाईल कोणत्या कामासाठी वापरावा हे शिकवू. दरडोई उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे यावर चर्चा करू. उद्योजक घडवूया. तेव्हाच मराठा समाजाची प्रगती होईल. समाजासाठी काम करणाऱ्यांना पुढे घ्या. जे वेळ देऊ शकत नाहीत त्यांना पदावरुन बाजूला करा. मराठा समाजाची इमारत नव्याने बनविण्यासाठी यावेळी सूचना खा.नारायण राणे यांनी दिल्या.यावेळी
एकमेका सहकार्य करू, मदत करू असे आवाहनही त्यांनी केले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वसाधारण सभेदरम्यान, समाजाप्रती मोठे योगदान देण्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उद्योजक विजय सावंत, डॉ.चंद्रकांत राणे, प्रा.जी.ए.सावंत, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार मिळविल्या बद्दल स्नेहलता राणे, आर्किटेक संतोष तावडे, आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रसाद राणे, उद्योजक बि.डी.सावंत, अदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाम सावंत, तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश मिळविलेली सर्जन डॉ. माणसी बिरमोळे यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन शाम सावंत यांनी तर प्रास्ताविक सरचिटणीस शशी सावंत यांनी केले.