नारायण राणेंनी कोकणसाठी जीवाच रान केलं : नीलम राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 14, 2024 11:28 AM
views 274  views

देवगड : आपला सिंधुदुर्ग जिल्हा विकसित व्हावा, जनतेला दोन वेळचे अन्न व्यवस्थित मिळावे, येथील युवकांना नोकरीसाठी वणवण करायला लागू नये, अशी राणेसाहेबांची इच्छा होती. यासाठी गेले कित्येक वर्षे त्यांनी जीवाचे रान केले व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी झटले. नामदार नारायण राणे हे पुन्हा खासदार व्हावेत केंद्रामध्ये भाजपाचे सरकार यावे. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट व्हावेत. यासाठी या  लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले मत नारायण राणे यांना मिळणे गरजेचे आहे असे आवाहन सौ निलमताई राणे यांनी पडेल येथे केले.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थी असलेल्या महिलांचा मेळावा पडेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे भावनिक आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष  श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर मेघा गांगण, सुमेधा पाताडे,देवगड तालुका महिला तालुकाध्यक्ष संजना आळवे, उषःकला केळुसकर, प्रियांका साळस्कर, तनवी चांदोस्कर, प्रणाली माने मनस्वी घारे, तालुकाध्यक्ष अमोल डॉक्टर अमोल तेली, पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे, बाळ खडपे अरिफ बगदादी इत्यादी उपस्थित होते.

सौ निलमताई राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या कामाबद्दल कौतुक केले. ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे आता काम करतात त्याच पद्धतीने आमदार झाल्यावर नारायण राणे काम करत होते. काही माणसे पोटातून शिकून येतात त्याप्रमाणे लोकसेवा हे व्रत आमदार नितेश राणे शिकून आले आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासारख्या कर्तुत्वान आमदाराबरोबरच नामदार नारायण राणे खासदार म्हणून या भागाला मिळावेत यासाठी त्यांना मतदान करा असे आवाहनही नीलम ताई राणे यांनी यावेळी केले. 

महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सुमेधा पाताडे, कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण यांनी आपल्या भाषणामध्ये नामदार नारायण राणे यांच्या रूपाने भाजपाला निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी नगरसेविका तनवी चांदोस्कर डॉक्टर अमोल तेली यांनीही आपले विचार व्यक्त केले.