
वैभववाडी : वैभववाडी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (११एप्रिलला) सायंकाळी पाच वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदानावर “सिंधुनायक केसरी” या नावाने निकाली कुस्त्यांचा जंगी थरार रंगणार आहे.
या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यासह विविध भागातील नामांकित मल्लांचा सहभाग असणार असून प्रेक्षकांसाठी ही मोठी आकर्षणाची पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेकरिता उपमहाराष्ट्र केसरी व भारत केसरी पै. प्रकाश बनकर तसेच ऑल इंडिया चॅम्पियन पै. अमित कुमार (दिल्ली) हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे व कुस्ती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष भालचंद्र साठे यांनी केले आहे.











