
देवगड : ढोल ताशांचा गजर, फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण वातावरणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंदोत्सव देवगड तालुक्यातील शिरगांव येथे मंगळवारी सायंकाळी साजरा करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. जस-जसा निवडणुकीचा निर्णायक निकाल प्रसारमाध्यमाव्दारे समजत होता तसतसे बाजारपेठेत भाजपाचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली. सांयकाळी उशिरा फटाक्याच्या आतिषबाजीत ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत लाडू वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी झेंडे मिरवत विजयी घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश लोके, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम, जिल्हा परिषद गट अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, उपसरपंच संतोषकुमार फाटक, साळशी माजी सरपंच सत्यवान सावंत, तोरसोळे माजी सरपंच महेश पवार, माजी उपसरपंच सुरेश राणे, हडपीड माजी सरपंच दाजी राणे, युधिराज राणे, बंडू माने, सुहास राणे, दिनेश लोके, संतोष तावडे, विनोद सरफरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.