महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे : नारायण राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: April 03, 2024 15:27 PM
views 371  views

कुडाळ : महायुतीचा लोकसभेसाठी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा एकमुखी निर्धार कुडाळ येथे भाजपा, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये घेण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की गेल्या १० वर्षात उबाठा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोणते काम या मतदारसंघासाठी केले ते त्यांनी दाखवावे कोणताही प्रकल्प त्यांनी आणलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.


कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, प्रदेश सरचिटणीस काका कुडाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


या सभेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. या मतदारसंघातील खासदाराने गेल्या दहा वर्षात कोणतेही विकासकाम केले नाही फक्त टीका करत राहणे एवढेच काम केले आहे बेरोजगारी घालवण्यासाठी कोणतेही प्रकल्प आणले नाही असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध योजना आणल्या आणि त्या लोकांपर्यंत घेऊन गेले ज्या योजना बनविल्या त्या फक्त गुजरात पुरती नाहीतर पूर्ण देशाचा विचार करून बनविल्या गेल्या. विरोधक फक्त त्यांच्यावर टीका करत राहिले आपल्या या मतदारसंघाचा कायापालट झाला पाहिजे तर आपल्या हक्काचा खासदार संसदेमध्ये जाणे आवश्यक आहे त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या महायुतीसाठी दिलेल्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.


महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे


महायुतीच्या या बैठकीमध्ये मंचावरील सर्व नेत्यांनी उबाठा सेनेच्या खासदारावर सडकून टीका केली याबरोबरच महायुतीचा खासदार या मतदारसंघासाठी किती आवश्यक आहे हे सांगितले. त्यामुळे अंतर्गत असलेले मतभेद विसरून तसेच एकमेकाबद्दल जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट पाठवून आपल्या महायुती बद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका असे आवाहन यावेळी सर्वच नेत्यांनी मंचावर केले.