
रत्नागिरी : ओबीसी, कुळ कायदाविषयक प्रश्नांचे अभ्यासक, लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचे अध्यक्ष, बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस नंदकुमार मोहिते (वय 65) यांचे आज खासगी रुग्णालयात निधन झाले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल , श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते. त्यांचे आज मुंबई येथे रुग्णालयात निधन झाले.
त्याचे पार्थिव उद्या शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी ७. ००ते ९.०० वाजता अंत्यदर्शनासाठी श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या शिक्षण संकुलामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गोरगरिब जनतेविषयी कळवळा असलेले अष्टपैलू नेतृत्व असलेल्या नंदकुमार मोहिते यांच्या निधनाने शिवारआंबेरे परिसरात शोककळा पसरली आहे. १९८५/८६ मध्ये कुळकायदा चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. बेदखल कुळांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासन दरबारी सरकारला जागे केले. अनेक मोर्चे काढून बेदखल कुळांच्या नोंदी जमिनीवर करण्यासाठी शासनाला भाग पाडले. कोकणातील लाखो शेतकऱ्यांना कसणाऱ्या जमिनीवर त्यामुळे हक्क प्राप्त झाला. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा पुरवठा व्हावा म्हणून देखील त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावरून प्रयत्न केले.
गोरगरिब बहुजन जनतेच्या मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा जवळच उपलब्ध व्हावी आणि उच्च शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शिवारआंबेर येथे त्यांनी लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच या परिसरातील असंख्य गोरगरिब मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकली. त्यांच्या निधनामुळे समाजातील एका नेतृत्वाला आपण हरपलो आहोत, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिली.