लढ्याला यश ; नागपूर - मडगाव एक्सप्रेसचं जंगी स्वागत !

रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडीत पेढे वाटप
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 19:58 PM
views 588  views

सावंतवाडी : दोन वर्षांच्या संघर्षानंतर काढून घेतलेल्या नागपूर - मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून यासाठी लढा उभारत ही एक्स्प्रेस पुन्हा देण्याची मागणी केली होती. गुरूवारी रेल्वे सावंतवाडी स्थानकात थांबताच स्वागत करत प्रवासी संघटनेकडून पेढे वाटप करण्यात आले.

 दोन वर्षांनी ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्यावतीने  एक्सप्रेसच स्वागत करण्यात आले. यावेळी मोटरमनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त साजरा करण्यात आला. सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे. यावेळी संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व माजी खासदार विनायक राउत यांचे रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार मानण्यात आले.

श्री क्षेत्र शेगावला गजानन महाराजांच दर्शन घेण्यासाठी कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा मंजूर होताचं क्षणी माडखोल येथील रेल्वे प्रेमी प्रितेश भागवत यांनी सावंतवाडी स्थानकातून शेगाव दौऱ्यासाठी ३० तिकीटे बुक करुन या गाड्याच्या सावंतवाडीतील थांब्याबाबत रेल्वेचे आभार मानले.

यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी उपाध्यक्ष सागर तळवडेकर, सचिव मिहीर मठकर, नंदू तारी, सुभाष शिरसाट, गोविंद परब, मेहुल रेडीज, साहील नाईक, राशी परब, विहांग गोठोस्कर, तेसज पोयेकर, राज पवार, शुभम सावंत, रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत, नितेश तेली, नितिन गावडे आदी उपस्थित होते.