
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालयाचे नुकतेच नॅक बेंगलोर कडून शैक्षणिक गुणवत्ता, कला, क्रीडा, साहित्य या सर्वांचे दि. २० व २१ ऑगस्ट रोजी मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकन समितीमध्ये श्री विद्यापीठ ओरिसाचे कुलगुरू डॉ.अजय कुमार सिंह हे अध्यक्षस्थानी तसेच मदर तेरेसा विद्यापीठ तामिळनाडू येथील इंग्रजी व परदेशी भाषा विभाग प्रमुख डॉ.जेयाप्रिया पलानिवेलू, बंगलोर आर व्ही डी चे सचिव प्राचार्य डॉ.भरतीश राव हे होते.
या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास 2.27 सी जी पी ए सोबत 'ब' श्रेणी प्राप्त झाली. पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाने उत्कृष्ट श्रेणी प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आ.शेखर निकम तसेच संस्थेचे सचिव महेश महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे तसेच आयक्यूएसी चे समन्वयक प्रा.संकेत कुरणे, सर्व प्राध्यापक वृंद, विभाग प्रमुख, कार्यालयीन कर्मचारी व आजी-माजी विदयार्थी यांचे विशेष कौतुक केले.
पुढे बोलताना शेखर निकम साहेब म्हणाले की स्व.निकम साहेबांचे जे स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरत आहे याचं समाधान वाटतं. सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या घटना व धोरणाप्रमाणे भविष्यामध्येही दुर्गम व डोंगराळ भाग व सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यां पर्यंत उच्च शिक्षणाची ज्योत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या व महाविद्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे केले जाईल तसेच उच्च शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल.