
चिपळूण : नॅशनल अॅक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स या भारतीय गुणवत्ता परिषद संस्थेने, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड चिपळूण संचलित, (NAB) नॅब आय हॉस्पिटल चिपळूण यांना एन. ए. बी. एच. एन्ट्री लेवल प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथील वैद्यकीय तज्ञांच्या पथकाकडून एन. एच. बी. एच. प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाची तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार हे प्रमाणपत्र रुग्णालयास प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी नॅब (NAB) चिपळूण च्या सर्व विश्वस्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.
नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी संस्था गेली तीस वर्षे जिल्ह्यात कार्यरत आहे. नॅब आय हॉस्पिटल जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदानच ठरले आहे. रुग्णालयात आज पर्यंत सुमारे 74000 नेत्र शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यातील 33000 हून अधिक शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक ओपीडी व मशिनरी सुसज्ज ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. मोफत व अल्प दरात अत्याधुनिक फेको मशीनद्वारे मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया , रेटीना तपासणी व उपचार, ग्रीन लेसर व याग लेसर उपचार केंद्र, ऑक्यूलोप्लास्टि तपासणी व शस्त्रक्रिया अश्रूनलिका,अश्रूग्रंथी तपासणी व उपचार, ओ सी टी पेरिमेंटरी तपासणी व उपचार येथे गरीब आणि गरजूंसाठी विनामूल्य आणि अल्प दरात उपलब्ध आहेत.